पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांच्या वतीने सातव्या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात २२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनचे संचालक योगेश आंबादास देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशपांडे यांनी याच शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले असल्याने विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्यांच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण ठरला.
कार्यक्रमात मा. श्री. सुभाष कदम, विद्यापीठ भाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षण हे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढवण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक एकता, अनुशासन आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी आपल्या भाषणात बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या लहान असताना या पतसंस्थेची सुरुवात झाली होती. आज या संस्थेचा मोठा वटवृक्ष झाला असून, त्याचा लाभ अनेकांना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी एकबोटे यांचीही उपस्थिती होती.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू झालेली ही पतसंस्था गेल्या सात वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्थेकडून स्वीकारली जाते. २५ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेली ही पतसंस्था समाजातील गरजू घटकांनाही आर्थिक आधार देण्याचे कार्य करत आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना योगेश देशपांडे यांनी, “आज मदत घेणारे आपण उद्या मदत देणारे व्हायला हवे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी सुभाष कदम यांनी दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली. तसेच सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनतर्फेही दोन विद्यार्थ्यांचा यावर्षीचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे, सहकार्य करणाऱ्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

