आत्मनिर्भर भारताचा निर्धार – महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा अधिकार!
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समान शैक्षणिक संधींसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS/SEBC/OBC) मुलींना आता 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत मिळणार आहे. यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न आता साकार होणार आहे.
व्यावसायिक शिक्षणात विशेष संधी
मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमही मोफत केले जाणार आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (CAP) प्रवेश घेण्यासाठी 100% सवलत देण्यात येणार आहे. हा निर्णय मुलींच्या शिक्षण प्रवासाला नवी दिशा देणार आहे.
शैक्षणिक नवोन्मेष आणि संधींचा नवा अध्याय
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम निवडीत लवचिकता मिळणार आहे. बहुशाखीय अभ्यासक्रमांसह (Multidisciplinary) विविध क्षेत्रातील ज्ञान मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे.
Academic Bank of Credits (ABC) अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्थांमधून क्रेडिट्स मिळवून पदवी पूर्ण करण्याची सोयही उपलब्ध आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘परिसस्पर्श योजना’
महाराष्ट्रातील महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनात देशात प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष टास्कफोर्स तयार केला आहे.
● 150 महाविद्यालयांना मार्गदर्शक म्हणून नियुक्ती
● उर्वरित महाविद्यालयांना नॅक प्रक्रियेत सहाय्य
● गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पारदर्शक व गतिमान पद्धतीचा अवलंब
शासकीय कामकाजासाठी ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’
शैक्षणिक व शासकीय प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी
● वेतनवाढ, पदोन्नती, अनुकंपा नियुक्ती आदी प्रकरणे तातडीने निकाली काढली जात आहेत.
● जलद निकाल, पारदर्शक प्रक्रिया आणि वित्तीय बचत यावर भर देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘अटल’ ऑनलाइन सराव परीक्षापद्धती
CET परीक्षांची तयारी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘अटल’ प्रणालीद्वारे ऑनलाइन सराव परीक्षांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांची संधी मिळणार आहे.
संविधान गौरव महोत्सव – देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा उपक्रम
फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यभरातील 6000+ महाविद्यालयांमध्ये संविधान गौरव महोत्सव आयोजित केला जाणार आहे. भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांची माहिती देणारा हा विशेष उपक्रम ठरणार आहे.
विदेशी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शिक्षणाची जागतिक ओळख
महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक खिडकी प्रणाली (Single Window System) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे देशविदेशातील विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळेल व महाराष्ट्र उच्च शिक्षणाचा ब्रँड तयार होईल.
मराठीतून उच्च शिक्षणासाठी ‘उडाण’ प्रकल्प
● अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन यासारख्या अभ्यासक्रमांची मराठी पुस्तके उपलब्ध
● मातृभाषेतून शिक्षणाला चालना
● ज्ञानसंपन्न महाराष्ट्र घडवण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय
वाचन संकल्प विशेष अभियान – वाचन संस्कृतीला प्रोत्साहन
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यस्तरावर
● पुस्तक परीक्षण
● कथन स्पर्धा
● वाचन प्रेरणा उपक्रम
● विचार समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी हा अभिनव उपक्रम
महाराष्ट्र – गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्रबिंदू
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://htedu.maharashtra.gov.in/Main/